*जीवनाकडे सृजनात्मक दृष्टीने पाहायला लावणारे पुस्तक म्हणजे बुद्ध:गौरवशाली मार्गदाता*
जळगाव जिल्ह्याच्या लेखिका चित्रा पगारे यांचा बुद्ध गौरवशाली मार्गदाता हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. आपल्या विचारांवर आपण अवघे जग निर्माण करू शकतो. असे म्हणणारे, जगाला शांततेचा संदेश देणारे, तथागत गौतम बुद्ध यांचा अष्टांग मार्ग, धम्माची आवश्यकता का? बुद्धांनी सांगितलेला मध्यम मार्ग, त्यांनी सांगितलेले कर्मसिद्धांत, बुद्ध तत्त्वज्ञानाचे बहुआयामीत्व, सामाजिक समस्या व त्यावर तत्वज्ञानाचे उपयोजन, बुद्धवाणी, त्यांनी दाखविलेला मार्ग आज जगाला प्रेरक बनू शकते. मार्गदर्शक ठरू शकतो. असे या ग्रंथाचे सार आहे.
या ग्रंथाच्या लेखिका कुमारी चित्रा पगारे या असून प्रकाशक ग्रॅव्हिटी पब्लिकेशन, अकोला यांनी प्रकाशित केले आहे.याची प्रथमावृत्ती १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पाचवे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन, अकोला येथे प्रकाशित केले आहे. मुखपृष्ठ अतिशय सुंदर, ध्यानस्थ बसलेल्या गौतम बुद्धाचे आहे. मूल्य केवळ ७० रुपये असून प्रस्तावना श्री विश्वनाथ शेगावकर (आय.ए.एस निवृत्त प्रधानसचिव तामिळनाडू राज्य) अकोला यांची लाभली आहे.
कोरोना काळामध्ये जैविक युद्ध रुपी महाभयंकर महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडले होते.डिप्रेशन, ताणतणाव, नैराश्य,समायोजन, मानसिक अपयश इत्यादी अनेक सामाजिक समस्या उद्भवल्या होत्या.या सर्वांचा आशय लक्षात घेऊन कवयित्री /लेखिका चित्रा पगारे यांनी जगाला विश्व शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा आणि शिकवणीचा अभ्यास करण्याकडे कल धरला. त्यातूनच महत्त्वपूर्ण सिद्धांत या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला. बुद्धतत्वज्ञान काळाची गरज आहे. म्हणून लेखिका चित्रा पगारे यांनी सखोल चिंतन, मनन, करून हा ग्रंथ लिहिलेला आहे.
जगाला युध्दाची नाही तर गौतम बुद्धाची गरज आहे. या उक्तीप्रमाणे आज संपूर्ण जग कसल्यातरी भय व ताणतणावाखाली जगत आहेत.त्यात विज्ञानाने सर्व प्रकारच्या शस्त्रांची निर्मिती केली आहे.मानवाने विध्वंसाची जी साधने स्वतः निर्माण केली आहेत आणि त्यातून त्याला बाहेर पडणे गरजेचे वाटू लागले आहेत.त्यामुळे बुद्ध नीति संपूर्ण जगाला द्या. करूणा,प्रेमभाव, शांती व अहिंसेचा संदेश दिला आहे. विश्वात संपूर्ण सजिवांशी, परस्परांशी करूणाभाव ठेवणे गरजेचे आहे. म्हणून आज जगाला युध्दाची नाही तर बुद्ध धम्माची आवश्यकता आहे.
तथागत बुद्धांनी सांगितलेल्या धम्माला विज्ञानाचा आधार आहे. धम्म हा प्रतित्यसमुत्पाद या सिद्धांतावर आधारित आहे. म्हणूनच जगातील वैज्ञानिक तथागत बुद्धाला जगाचा पहिला वैज्ञानिक म्हणून स्वीकारतात. प्रतित्यसमुत्पाद म्हणजे एका वस्तूच्या प्राप्तीवर दुसऱ्या वस्तूची उत्पत्ती होणे.तथागत गौतम बुद्धांनी प्रतित्यसमुत्पाद सिद्धांत आणि अनित्यतेचा सिद्धांत असे महत्त्वाचे सिद्धांत सांगितले आहेत.लेखिका चित्रा पगारे यांनी तथागत गौतम बुद्धाने शोधलेले मानवी जीवनातील दुःखाचे कारण खूप अभ्यासपूर्ण व तत्वज्ञान पूर्ण पद्धतीने सांगितले आहे. यामध्ये चार आर्यसत्य सांगितले आहेत. पहिले१) आर्यसत्य जगात दुःख आहे.२) दुःख निर्माण होण्याची कारणे.३) दुःखापासून मुक्त होता येते.४) दुःखावर मात करण्याचा उपाय.
जीवनात दुःख आहे पण दुःखावर काहीच इलाज नाही असे नाही. दुखाच्या वास्तवाला मिटवून टाकता येते. दुःखाच्या प्रत्येक व्यक्तीचा पराभव करता येतो. दु:खाना पराभूत करण्याचा बुद्धाने सांगितलेला मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग होय. बुद्धाने सांगितलेला अष्टांगिक मार्ग एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. यामध्ये एकूण आठ भाग येतात. त्याला अष्टांग मार्ग (मध्य मार्ग) असे म्हणतात. यामध्ये १) सम्यक दृष्टी २)सम्यक वाचा ३) सम्यक संकल्प ४)सम्यक कर्म ५) सम्यक आजीविका ६) सम्यक स्मृती ७ सम्यक व्यायाम ८)सम्यक समाधी शब्दाचा अर्थ यथार्थ योग्य असा होतो बुद्धाने सांगितलेला मध्य मार्ग हा एक प्रकारचा जीवन मार्ग किंवा जीवन शैली आहे.
विपश्यना ही बुद्धाने सांगितलेले बौद्ध धर्माची पद्धती आहे.हे जगाला जे महत्त्वपूर्ण तत्वज्ञान सांगितले त्यातील महत्त्वाचा विषय म्हणजे ध्यान विपश्यना. या शब्दाचा अर्थ स्वतःच्या आत डोकावणे असा होतो बुद्धांनी स्वतःच्या ध्यान पद्धतींचा अभ्यास करून अंतर्ज्ञान प्राप्त केले आहे. ही विपश्यना ध्यान पद्धति आत्मसात केल्यानंतर व्यक्ति स्वतःकडे तटस्थपणे पाहायला शिकतो.
'अत्त दीप भव' हा उपदेश बुद्धाने जगाला सांगितलेला आहे. आणि तो मानवी जीवनाचा परम आदर्श आहेत. मनुष्य स्वतः स्वतःचा मार्ग दीप होणं गरजेचे आहे. बुद्धाने सांगितलेल्या कर्म सिद्धांतानुसार कर्म आणि त्याचे मिळणारे फळ ही त्याची प्रतिक्रिया. हे मन, राग मुक्त लोभ मुक्त दोषमुक्त असेल तर चांगले कर्म घडून येतात. तेच मोह, लोभ, द्वेष यांच्या आहारी गेले तर वाईट कर्म घडून येतात. मनुष्याला कर्मानुसार त्याची फळे मिळत असतात. त्यासाठी मनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. असं बुद्ध म्हणतात
तथागत गौतम बुद्धांच्या अष्टांग मार्ग, तत्व सिद्धांत, त्यांचे तत्वज्ञान , बुद्धांनी सांगितलेल्या अहिंसेचा सिद्धांत लोकशाही आणि बुद्ध तत्वज्ञान आणि बुद्ध धम्म आणि समाजशास्त्र बुद्ध तत्त्वज्ञान आणि संत साहित्य यांचा संबंध विपश्यना प्रणाली व सामाजिक मानसिक शांतता सामाजिक समस्या, प्रति बुद्ध तत्त्वज्ञानाचा दृष्टिकोन बुद्धवाणी, तथागत बुद्धाने मांडलेले सुविचार,प्रेमाबद्दल मांडलेले सुविचार, कर्माबाबत मांडलेले सुविचार, शांतते बाबत मांडलेली सुविचार, बुद्धांचे प्रेरणादायी विचार आनंदा विषयीचे सुविचार, मैत्री बद्दलची शिकवण,यशाबद्दल ची शिकवण या सार्या मार्गदर्शक विचारांचा सखोल अभ्यास कुमारी चित्रा पगारे यांनी अभ्यासपूर्ण हा ग्रंथ निर्माण केला आहे.
कुमारी चित्रा पगारे यांना बुद्धाचा प्रवास त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप महत्त्वाचा ठरला आहे. त्यामुळेच तर त्या अत्यंत मौलिक व मार्गदर्शक असणाऱ्या ग्रंथाची निर्मिती चित्राताईकडून झाली हे गौरवास्पद आहे.बुद्ध तत्वज्ञान काळाची गरज आहे.म्हणून चित्रा पगारे यांनी सखोल चिंतन मनन करून हा ग्रंथ लिहिलेला आहे त्यात प्रतित्यसमुत्पाद आणि त्याचा सिद्धांत कर्मसिद्धांत बुद्धांचे अष्टांगिक मार्गाचे तत्वज्ञान, मादक पदार्थांच्या सेवनावर ईल उपाय आणि बुद्ध तत्त्वज्ञानाचे आयामीत्व इत्यादी बुद्ध विनया वर लेखिकेने केलेल्या ग्रंथाची मांडणी आकर्षक झाली आहे या सर्व बाबींमुळे हा ग्रंथ निश्चितच वाचनीय आणि संग्रही ठेवण्यासारखा आहे.
लेखिका चित्रा पगारे यांना पुढील साहित्य निर्मितीसाठी खूप खूप शुभेच्छा
समीक्षिका/ शिक्षिका/ लेखिका /कवियित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि. वाशिम