ती च्या मनातील घालमेल फक्त तीच जास्त ओळखू शकते. एका स्त्रीच्या मनातले भाव, शब्दमाधुर्य,प्रेमरसाने बहरत जाऊन, ती च्या काव्याचा सुगंध सर्वत्र दरवळत राहतो. असाच एक काव्यसंग्रह म्हणजे 'ती अशीच आहे' कवयित्री चित्रा पगारे व कवयित्री मीता नानवटकर या दोन जिवाभावाच्या मैत्रिणी यांचा एक काव्यसंग्रह.मी आजपर्यंत प्रातिनिधिक काव्यसंग्रह अनेक वाचले पण दोन कवयित्रीचे संयुक्तिक काव्यसंग्रह प्रथमच माझ्या वाचनात आले. दोन भिन्न व्यक्तींचे विचार एकत्र जुळणे ही बाब खरोखरच कौतुकास्पद व खऱ्या मैत्रीचे प्रतीक आहे. आजकाल आपण पाहतो बऱ्याच मैत्रिणी या शॉपिंग पुरत्या,पार्टीपुरत्या किंवा इतर कार्यक्रमापुरत्या असतात. पण दोन भिन्न जिल्ह्यातल्या कवयित्री एकत्र येऊन काव्यसंग्रह काढतात. ती च्या शोधात म्हणजे स्त्रीच्या जीवनावर आधारित विचार यांचा सुरेख संगम जिथे जुळून येतो तिथे खरोखर माझे कर आपोआप जुळतात.
'ती अशीच आहे' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन परिस पब्लिकेशन पुणे यांचे असून मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी स्त्री (ती) चे कर्तव्यदक्ष असणारे हात व त्या झाडावर बसलेली ती चिमणी काढलेले बोलके चित्र बघताक्षणीच काव्यसंग्रह वाचनाची गोडी वाढवते. या काव्यसंग्रहाची पहिली आवृत्ती १७ ऑक्टोबर २०२१ मध्ये प्रकाशित झाली असून मुल्य केवळ दीडशे र१५०/ असले तरी ती चे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात किती महत्वाचे आहे? ते शेवटी मनाला पटते. या काव्यसंग्रहाला प्रस्तावना धनंजय मुळे भंडारा व विष्णू संकपाळ यांची लाभली आहे.
ती अशीच आहे
फुलापेक्षाही नाजुक
नारळासारखे कठीण
पण आतून कोमल
रागामागेही जिचे अतुट प्रेम आहे
भांडूनही जी हक्काने हवे ते मागून घेते.
निसर्गाने स्त्रियांना अद्भुत शक्ती प्रदान केली आहे. स्त्रियांच्या स्त्रियांना जेवढी सहनशक्ती दिली आहे तेवढेच संवेदनशील मन ही तिच असतं.ती जेवढी फुलासारखी नाजुक आहे. तेवढीच बाहेरून नारळासारखी कठीण आहे. पण आतून खूप कोमल आहे. मायेचा सागर आहे. पुराणात पुरातन काळापासून स्त्रीला खूप महत्त्व आहे. तिच्या रागा मागेही अतूट प्रेम दडलेलं असतं. एखादी स्त्री आपल्या मुलाला एक चापट जरी मारली तरी दिवसभर तिला रुखरुख लागून राहते की मी उगाच चापट मारली. तिची माया अगाध आहे. तिचं मन अगदी लहान मुलाप्रमाणे निरागस आहे. ती नसली तर ती च्या अस्तित्वाच्या खुणा घरभर पसरलेल्या असतात. ती जितकी धांदरट आहे तितकीच समजदार आहे. ती च्या मनाचा ठाव कोणालाही घेता येणार नाही. अशी परमेश्वराची ती खास निर्मिती आहे.
स्त्रियांच्या जबाबदाऱ्या, ती च्यावर लादलेली बंधने, तिचा कणखर करारी बाणा, ती चं उदार असणारं अंतःकरण, तिचे निरागस भाव, घरासाठी समर्पित होणारी ती, ती च्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा, ती च्या शिवाय तो नाही, तिच्यावर होणारा अन्याय, ती ची होणारी उपेक्षा, ती चा संघर्ष, ती च्या आयुष्याची जडणघडण, ती ने खाल्लेल्या खस्ता,तीचे कष्ट, मेहनत, ती ची जिद्द, ती चं सौंदर्य, ती च फुलपाखरासारखं भिरभिरणारं मन,ती चा तो स्पर्श, ती चा तो आपुलकी भाव, अनेक नात्यात गुंफिली जाणारी ती, आयुष्याचा खडतर प्रवासाची ती सोबतीन, अशा सर्वांगाने व्यापून गेलेली ती, ती च्याविषयीचे उत्कट भाव कवयित्री चित्रा पगारे व कवयित्री मिता नानवटकर यांनी "ती अशीच आहे" यातून व्यक्त केल्या आहेत.
खुल्या आभाळाखाली निर्भय अन्
उघड्यावरचा संसार मी थाटला आहे
कष्टाने पेटलेल्या चुलीवरती कधी
मी माझाच हात भाजला आहे.
वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी गरिबांना किती कष्ट सोसावे लागतात. किती खस्ता खाव्या लागतात. हे फक्त गरिबांना माहिती असतं. गरिबांना घरादाराचा आधार नसला की खुलं खुल्या आभाळाखाली कसली भीती नाही आणि उघड्यावरचा संसार त्यांनी थाटलेला असतो. कष्टाने पेटलेल्या चुलीवर गरिबांचा हात भाजतो. अशी व्यथा मी कामगार बोलतोय कवितेतून संवेदनशील मनाच्या कवयित्री चित्रा पगारे यांनी मांडली आहे.
भेटी साजनाचा ह्रदयात ध्यास आहे
डोळ्यात आसवांचा पाऊस खास आहे
ओढ अनामिक आता ध्येयात गुंतलेली
दरवळतो भोवताली तुझा सुवास आहे.
कवयित्री नीता नानवटकर यांनी वरील शेर आनंदकंद या वृत्तपत्रातील लिहीला असून त्यांनी स्त्रीला साधणार्या साजनाच्या भेटीची ओढ, त्याच्या आठवणी व साजनाच्या प्रेमाचा दरवळणारा सुवास गझलेतून व्यक्त केला आहे.कवयित्री मीता नानवटकर यांच्या गझलेचा वेगळाच थाट या काव्यसंग्रहाला मखमली लेस लावून जातो. स्त्रियांचं जगणं.. जगता-जगता होणारी परवड, तिचे स्वातंत्र्य, तिची ती बंदिस्त अवस्था, ती चर्या साठी धडपडणारी ती सावित्री, सावित्रीचे ते कार्य, सावित्री मुळे झालेली स्त्री जातीची प्रगती, तिने घेतलेली गरुड झेप, ती च्यातली ती समर्पण करणारी वृत्ती, ती ची विरह भावना, ती चे प्रेम करणारी ती कळी, तिच्यावर लादलेली अनेक बंधनं झुगारून देऊन ती ने केलेला तो प्रवास हे सारे काही कवयित्री मिता नानवटकर यांनी अगदी सुरेखपणे मांडले आहे.
पेलून संकटांना मी वाकणार नाही
वाटेत आयुष्याच्या मी थांबणार नाही
चाखून वेदनांना पाहील धाडसाने
डोहात आसवांच्या मी वाहणार नाही....!
कवयित्री मीता नानवटकर यांनी एक स्त्री संकटावर कशी मात करते? अनेक संकटं झेलण्याचे धाडस स्त्रीमध्ये असते. आयुष्याच्या वाटेवर ती कधीच थांबत नाही. संकटसमयी सुद्धा स्त्री वेदनेने व्याकुळ न होता धाडसाने समोर जाते.इतकेच नाही तर दुःखाचा डोंगर कोसळला तरी आसवांचा डोहात मी वाहणार नाही. अशी खंबीर स्त्री म्हणजे 'ती ती अशीच आहे' ईश्वराने स्त्रीचे मन जरी हळवे बनवले असले तरी ती ला धाडसी सुद्धा बनवले आहे. परमेश्वराची खास कलाकृती म्हणजे स्त्री 'ती अशीच आहे'.
कवयित्री चित्रा पगारे व मीता नानवटकर या दोघींच्या कवितेचा संयुक्तिक काव्यसंग्रह स्त्री म्हणजे ती. ती च्या अस्तित्वाचा शोध घेणारा असल्याने रसिकांच्या, वाचकांच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे. कवयित्री नीता नानवटकर यांच्या अनेक गझल खूप काही सांगून जातात. वास्तवतेचे दर्शन घडवणाऱ्या, तिचं जगणं,खूलनं,फुलनं, ती च अस्तित्व व्यक्त करणाऱ्या कविता सरळ काळजाला जाऊन भिडणा-या अशाच कविता या काव्यसंग्रहात आहेत. काही कविता सामाजिक भान जपणाऱ्या तर काही कविता प्रकाश टाकणा-या आहेत. या काव्यसंग्रहात एकूण 80 कविता असून अत्यंत उत्कृट दर्जाच्या आहेत.
कवयित्री चित्रा पगारे व कवयित्री मीता नानवटकर यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम