वर्धा जिल्ह्याचे प्रसिद्ध कवी अरुण विघ्ने यांचा चौथा काव्यसंग्रह मी उजेडाच्या दिशेने निघालो नुकताच वाचनात आला. या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ तिमिरातुनी तेजाकडे म्हणजेच अंधारातून उजेडाकडे नेणारे आहे. नावाला साजेसे सुंदर मुखपृष्ट प्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी रेखाटले असून दर्जेदार बांधणी व प्रकाशन मध्यमा प्रकाशन नागपूर यांनी दिनांक २७ जानेवारी २०२१ रोजी याची प्रथमावृत्ती प्रकाशित केली आहे.या काव्यसंग्रहाला प्रस्तावना डॉ.भूषण रामटेके यांची लाभली असून मलपृष्ठावर डॉक्टर प्रमोद मुनघाटे यांनी पाठराखण केली आहे. या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ २२० रुपये आहे पण यातल्या सर्वच कविता प्रकाशाच्या दिशेने नेणा-या आहेत.
वर्धा जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी हरिभाऊ विघ्ने यांचा पहिला कवितासंग्रह पक्षी, वादळातील दीपस्तंभ, जागल असे तीन कवितासंग्रह यापूर्वी प्रकाशित झालेले आहेत. त्यानंतर 'मी उजेडाच्या दिशेने निघालो' हा चौथा कवितासंग्रह काळोखातून उजेडाच्या दिशेने नेत स्वातंत्र्य, समता, बंधुता,न्याय, करुणा, प्रेम, मैत्री, अहिंसा या मूल्यांची ओळख करून देणारा आहे. जाती भेदभाव दूर करून कामगार कष्टकरी,शेतकरी, पीडित, शोषित, वंचित लोकांना आपल्या हक्काची ओळख करून देणारा आहे.
ज्योतिबा
तुम्ही झुगारलेत गुलामगिरीचे बंध
तोडलेत जातीभेदाचे साखळदंड
आणि घातलात पाया स्त्रीशिक्षणाचा
रूढी-परंपरांना तोडून
तुम्ही वंचितांचे,उपेक्षितांचे,शोषितांचे, अस्पृश्यांचे,
क्रांतीबा आणि क्रांतीमा होऊन ओढलात आसूड
तत्कालीन व्यवस्थेवर
तुमच्या बंडानेच आज स्त्री घेतेय सर्वच क्षेत्रात गगनचुंबी भरारी
तुमचा वारसा चालवीत बाबासाहेबांनीही त्याला
कायद्याने बळकटी दिली
आणि शिक्कामोर्तब झाले सर्वांगीण विकासावर...
बहुजन समाजाला पूर्वी शिक्षणाचा गंधही नव्हता तेंव्हा क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुलेंनी गुलामगिरीचे बंधने तोडून जातीभेदाचे साखळदंड तोडून सर्वांना शिक्षणाचे बाळकडू पाजले.स्त्री शिक्षणाचा पाया फुले दांपत्यांनी रचला. सावित्री ज्योतिबा यांनी अखंड आयुष्य दुसऱ्यासाठी घालविले. ज्ञानाचा दीपक लावला. जुन्या, रुढी,परंपरांना तोडून वंचितांना, शोषितांना, उपेक्षितांना,अस्पृश्यांना शिक्षण दिले.सर्वांचे क्रांतिबा आणि क्रांतीमा ठरलात. तत्कालीन व्यवस्थेवर आसूड ओढले.आज सावित्रीज्योती यांच्यामुळे स्त्रिया आज सर्वच क्षेत्रात गगनचुंबी भरारी घेतात. पुर्वीच्या काळी स्त्रियांना फक्त चूल आणि मूल इतक्यातच अडकवून ठेवलं जात होतं. ज्योतीबांच्या विचारांचा वारसा चालवणार्या बाबासाहेबांनी कायद्याने ज्योतीबांच्या विचाराला बळकटी दिली. त्यामुळेच आज सर्वांगीण विकास होतोय असे परिवर्तनवादी विचार करणारा कवी अरुण विघ्ने आपल्या पहिल्या कवितेतूनच क्रांतीज्योती महात्मा फुले सावित्री आई व बाबा साहेबांच्या चरणी काव्यफुले वरील ओळीतून अर्पण करताना दिसतात.
दिव्यांनी ठरवावं आपापलं
कुठे कुठे पेटून प्रकाशायचं
कुठला अंधार करावा नाहीसा
आणि कुठे आपसूक विझायचं ....
प्रकाशातच पेटतात दिवे सारे
त्याच महत्त्व कसं समजायचं
काळोखात पेटलेल्या एका पणतीचं
अस्तित्व तरी कशाला मोजायचं....!!
परिवर्तनवादी विचारांचा कवी अरुण विघ्ने यांच्या सर्वच कवितांची उंची व खोली खऱ्या विचारवंताला विचार करायला भाग पाडतात. खोल आशयसमृद्ध असणाऱ्या कविता काळजापर्यंत आतल्या उजेडाकडे नेतात.अंधारात गुरफटलेल्या व्यक्तीला प्रकाशाचा मार्ग दाखवण्यासाठी प्रत्येक कविता दिव्याप्रमाणे मार्गदर्शक ठरत आहे. दिव्यांनी ठरवायचं कुठे पेटवून प्रकाशायचं? कुठला अंधार नाहीसा करायचा आणि कुठे आपणच विझायचं.. प्रत्येक माणसाने सुद्धा स्वतः ठरवायचा आहे आपणही दिवा होऊन अंधाराला चिरत इतरांना मार्ग दाखवायचं. कुठे विझायचं हे सुद्धा मानवाने ठरवावं. प्रकाशात तर सारेच पेटून उठतात त्याचं महत्त्व फार नसतं. पण काळोखात पेटलेल्या एका पणतीचे अस्तित्व का नाही मोजता येतं? असा खडा सवाल कवी अरुण विघ्ने आपल्या काव्यातून करताना दिसतात.
मायी माय भिमाबा
करी जात्यात दयन
उखयात मिरच्यावाणी
करी कुप्रथाचं कांडण....!!
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म ज्या मातेच्या पोटी झाला त्या भिमाबाईने किती खस्ता खाल्ल्या ? किती कष्ट भोगले? किती हाल सोसले? हे कवी अरुणजी आपल्या काव्यातून स्पष्ट करतात. भीमाईनं जात्यावर दळण दळते. उखळात मिरच्या जशा ठेचल्या जातात त्याप्रमाणे कुप्रथांना कांडते. रूढी-परंपरांना कुटतात. दाने जात्यात टाकत चंद्र भुकेचा रांधत म्हणजेच पोटासाठी, भाकरीसाठी दळण दळते. या अष्टाक्षरी काव्यातून कवीने जातीभेदावर प्रहार केला आहे. अनिष्ट रूढी परंपरांना संविधानाने तोडलं आहे.
हे करूणाकार बुद्धा
अखिल विश्वाचा प्रवास करून
लाखो खाचखळग्यातून चालताना
तृष्णेच्या कोटी कोटी दगडाला ठेचाळून
रक्तबंबाळ होऊन थकलेली माझी पावलं
आता तुझाच अष्टांग मार्ग चोखाळणार आहे बुध्दा
बोधिवृक्षाखाली विसावणार आहेत कायमची
भरकटलेली पावलं तुझ्याकडेच येत आहेत शांतिदूता
मी उजेडाच्या दिशेने निघालो आहे...
अख्ख्या जगाला शांतीचा संदेश देणारे करूणाकार गौतम बुद्ध विश्वाचा प्रवास लाखो खाचखळग्यातून करतात तेव्हा तृष्णेच्या कोटी दगडांना ठेचाळत रक्तबंबाळ झालेली पावलं तुझाच अष्टांग मार्ग स्वीकारणार आहेत. तुझ्याच बोधीवृक्षाखाली विसावणार आहेत. भरकटलेली पावलं तू दाखवलेल्या दैदिप्यमान उजेडाकडे निघत आहेत. हे शांतिदूता आता तू जगाला शांततेचा संदेश देतो. त्याच प्रकाशमान उजेडाच्या दिशेने मी सुद्धा निघालो आहे. असे कवी वरील ओळीतून व्यक्त होतो.
धागा माणुसकीचा, शिवतो फाटलेली नाती
आणि दुभंगलेली मने अविरत
धागा एकतेचा, ठेवतो असंख्य फुलांना एकत्र जोडून
एकमेकांशी नात्यासारखा घट्ट...
माणुसकीच्या धाग्याने फाटलेली नाती आणि दुभंगलेली मने शिवणारा धागा हो.एकतेच्या धाग्याने अनेक फुलांना एकत्र जोडून एकमेकांशी घट्ट जोडणारा धागा हो. प्रेमाच्या धाग्याने असंख्य अक्षरे, शब्द शब्द बनवून, भावभावनांना,प्रेमाला कवितेत गुंफणारा कवी समतेच्या धाग्यांनी जात,धर्म, पंथ,देश, वर्ण यांना जोडून समूह बनविणारा कवी समतेचा धागा हो म्हणून कवितेच्या माध्यमातून दिशा दाखवित आहे.
कवी अरुण विघ्ने यांच्या कविता माणसाला जातिभेद दूर सारून समतेच्या, न्यायाच्या, वेदनेच्या, स्वातंत्र्य, समता, बंधुता याचे महत्त्व विषद करणाऱ्या, माणसाला माणसासम वागायला शिकवणाऱ्या शाहू,फुले,आंबेडकरांच्या विचारांचा वारसा चालविणाऱ्या, देशप्रेम, सावित्री,भिमाई,रमाई चा त्याग सांगणाऱ्या, विषमतेवर प्रहार करणाऱ्या, शांततेचा संदेश देणाऱ्या, बुद्धाच्या मार्गाकडे नेणाऱ्या, मानव मुक्तीचा जाहीरनामा सांगणाऱ्या,उपेक्षितांच्या, शोषितांच्या, वंचितांच्या व्यथा मांडणाऱ्या, संविधानाचे गाण गाणाऱ्या, गाडगे बाबांचे कार्य सांगणाऱ्या, महामानवाचा संदेश सांगणाऱ्या, अंधाराकडून उजेडाकडे नेणाऱ्या एकूण ८३ कविता थेट काळजाला भिडणार्या आहेत. माणसाला माणूसपण आणि शहाणपण शिकवणा-या आहेत.
वाचणा-यांच्या डोक्यात दैदिप्यमान प्रकाश टाकणाऱ्या, तिमिरातुनी तेजाकडे नेणाऱ्या असून वर्हाडी भाषेचा आस्वाद घेणाऱ्या सर्वच कविता प्रत्येकानं आवर्जून वाचाव्यात अशाच आहेत.
प्रसिद्ध कवी अरुण विघ्ने सरांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा..!
समीक्षिका/ लेखिका/ शिक्षिका/ कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
मो.9767663257

