आपल्या मनातली वेदना जेव्हा बोलून दाखवता येत नाही. तेंव्हा कवितेचा जन्म होतो. कवीचं मन तसंच असतं.तो निराशेकडून -आशेकडे नेणारा,अंधाराकडून- प्रकाशाकडे नेणारा, असत्याकडून -सत्याकडे नेणारा एक मार्ग असतो. तोच खरा आत्मविश्वास असतो. निष्पर्ण झालेल्या वृक्षाला नवीन कोवळी पर्ण फुलावीत. अगदी त्याप्रमाणेच कवीचे शब्द शब्दबद्ध होतात आणि कवितेचा जन्म होतो. अशाच वेदनेचा हुंकार म्हणजे पुण्याचे ज्येष्ठ कवी शरद कवठेकर सर यांचा काव्यसंग्रह 'निष्पर्ण वेदना' हा नुकताच वाचनात आला. या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय सुंदर पर्ण नसलेल्या वृक्षासोबत वेदना मांडणारे आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन परीस पब्लिकेशन यांनी १ जानेवारी २०१९ रोजी प्रकाशित केले आहे. नावाला साजेसे सुंदर चित्र प्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी रेखाटले असून प्रस्तावना आदित्य अ. जाधव यांची लाभली आहे. या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ १२० रुपये आहे. पण यातल्या सर्वच कविता स्वतःचा शोध घ्यायला लावणा-या आहेत.
कुठे वृक्ष तर कुठे हिरवळलेली वाट
याच वाटेवरून गेल्या कित्येक दिवसापासून चालतोय
स्वतःच्याच मर्जीन हा मार्ग निवडलाय
कधी एकटाच चाललो तर कधी समूहात
रस्ता हरवलो तरीसुद्धा
वाट तुडवतच राहिलो
खाच-खळगे मागे टाकत राहिलो न
पुढे पुढे जातच राहिलो
अगदी सराईतपणे....!!
वाटेसाठी चालणं नसते. चालण्यासाठी वाट असते. या उक्तीप्रमाणे कवी शरद कवठेकर स्वतःच स्वतःची वाट शोधीत निघाला आहे. कित्येक दिवसापासून.. 'जो थांबला तो संपला' या उक्तीप्रमाणे कवी कधीच थांबत नाही. मनात एक आशेचा किरण घेऊन एकटाच चालला आहे. कधी हरवतो तरीसुद्धा. कधी चालणं थांबत नाही. ती वाट तुडवीत प्रकाशाच्या शोधात अविरतपणे चालू आहे. चालताना वाटेत असंख्य खाच-खळगे लागतात. आयुष्याच्या चढ-उतारावर सुद्धा सुख दुःख झेलीत जावे लागते. अगदी त्याप्रमाणेच कवी पुढे पुढे जातोय. अगदी सराईतपणे. आयुष्यात कसलीही तक्रार न करता, रूक्ष वाट टाळून हिरवळलेली वाट शोधत. आपल्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी आयुष्याचा खडतर प्रवास अविरतपणे कवी शोधत शोधत पुढे पुढे जातो आहे. पण मनामध्ये प्रचंड आशावाद ठेवून जन्म-मृत्यूचा अर्थ लावीत सुखाचे क्षण वेचीत, जखडलेला श्वास त्या मूक समाधीवर जन्ममृत्यूच्या प्रतिबिंबातला काळोख त्याचा अर्थ उलगडत. सत्याची साक्ष देत देहातला हुंकार ग्वाही देत, कवी नवा अर्थ शोधतो आहे.
झाडाच्या शेजारी झाडं
इकडे झाडं तिकडे फक्त झाडेच झाडे
गावात झाडे ,जंगलात झाडे
वस्तीत झाडे,मनात झाडे
झाडं हळुवार हिरवीगार सावली धरतात एकमेकांवर
झाडं कधी हल्लाबोल करत नाहीत
कधी कोणाची चेष्टा करत नाहीत
कधी दुसऱ्या झाडावर घाव घालत नाहीत.
वरील ओळींमधून कवी झाडाचे महत्व सांगतो आहे.आज स्वार्थी माणूस मात्र झाडांच्या कत्तली करत सुटला आहे.पूर्वी सर्वत्र झाडेच झाडे दिसायची. गावात झाडे वस्तीत झाडे, मनात झाडे. झाडं माणसाला फक्त सावलीच नाही तर अनेक औषधं सुद्धा देतो. पाने, फुले, फळे, डिंक इत्यादी बरोबरच शुद्ध,मोकळी ताजीतवानी हवा देतो. झाड कधी हल्लाबोल करत नाही. मी तुला इतके दिले असं कधीच म्हणत नाही. झाड कुणाची चेष्टा करत नाही. कधी दुसऱ्या झाडावर घाव घालत नाही. झाड सदैव परोपकारी असतं. माणसाने सुद्धा झाडासारखं वागलं तर असा सवाल कवीमनाला पडतो आहे.
बंद क्षितीजाच्या तटबंदी ओलांडून
संथ श्वासाचा झरा
अलगत अलगत पार करत
ढगांचे वांझपण सोबती घेत
ती आली....
कांही निष्पर्ण वेदना घेऊन आली
माझ्याशी फितुरी करत करत आली
गाभा-यातला पाचोळा तुडवत आली
तो श्वासाचा झरा
त्या निष्पर्ण वेदना...!!
मानवी मन देहाच्या तटबंदी ओलांडून सतत फिरत असतं. सोबतीला संथ श्वास असतोच. मनामध्ये असलेली 'ती' ला शोधत निघतो. ती येते खरी पण काही निष्पर्ण वेदना घेऊन. कवी मनाशी फितुरी करत नाजूक कोवळ्या मनाचा गाभारा तोडून. न दिसणाऱ्या निष्पर्ण वेदना देऊन जाते.
कवी शरद कवठेकर यांच्या सर्वच कविता मुक्तछंदातल्या असल्या तरी लाघवी आहेत. भाषेच्या सौंदर्यापेक्षा, सत्याने गुंफलेलल्या आहेत.मानवी मनाच्या गाभाऱ्याला स्पर्श करणार-या आहेत. अर्थ शोधणा-या आहेत. साद घालणा-या आहेत. वरवरच्या अविर्भावात जगण्यापेक्षा अस्तित्वाचा शोध घेणा-या आहेत. कविता वाचकाला भुरळ घालणाऱ्या आणि विचार करायला लावणार्या, जीवनाचा अर्थ शोधणा-या आहेत.
दगडाचा देव आणि आम्ही ह्या
दगडी देवालाच फुले वाहतो
दगडालाच तेलातूपानं न्हाऊ घालतो
दगडाला गोडधोडाचा नैवेद्य
आणि आम्ही मात्र उपाशीच
प्रत्येकाचाच दगड वेगवेगळा
कुणाचा दगड मंदिरात तर
कुणाचा दगड उघड्या बोडक्या
माळरानातल्या कुठल्याशा झाडाखाली
दगडाची पूजा... दगडाला शेंदूर बुक्का
या दगडांच्या देशात माणूस ही झालाय दगडं...!!
वरील ओळीतून अगदी खोल अर्थ असणार्या पण डोळस भावना संवेदनशील मनाचा कवी शरद कवठेकर म्हणतो दगडाचा देव आणि आम्ही दगडाच्या देवाला फूले घालतो. दगडालाच तेलातूपान न्हाऊ घालतो. दगडालाच गोडधोडाचा नैवेद्य दाखवतो, पण आम्ही मात्र उपाशी आज आपण पाहतो मंदिराच्या बाहेर कितीतरी मुलंबाळं, अपंग, उपाशीपोटी बसलेले वृध्द दिसतात आणि त्याच मंदिरात दगडाच्या मूर्तीवर कितीतरी दूध ओतले जाते. सर्वच्या सर्व दूध वाया जाते पण भुकेल्या बाळाला कोणी तेच दूध देत नाही. कारण माणूस ही दगड झालाय माणसाचं मन सुद्धा दगडासारखं झाले अशी खंत कवी शरद कवठेकर व्यक्त करताना दिसतात.
जखम, आर्त क्षण, प्रश्नचिन्ह, बेभान, मनातले भाव,मी, अंधार, आठवणी, आपल्यातलाच कुणीतरी, रिकामी ओंजळ, वेदना, आठवणीची पाखरं, बिंब भावनांचे, जळकं रान, दुःखाचा पाऊस इत्यादी कविता माणसाचा शोध आणि बोध घ्यायला शिकवणा-या आहेत. वास्तववादी विचारांच्या आहेत.डोळसपणे सत्य सांगणा-या आहेत. प्रत्येक कवितेचं स्वतंत्र विश्व आहे. प्रत्येक कवितेत एक वेदना आहे. एक हुंकार आहे.प्रत्येक कविता विचार देऊन जाते आणि विचार करायला भाग पाडते.
कवी शरद कवठेकर यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा....!!
समीक्षिक /लेखिका /शिक्षिका /कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
तालुका -जिल्हा वाशिम
मो.9767663257
