Sunday, 14 March 2021

जीवनाचा वेध घेणाऱा काव्यसंग्रह म्हणजे-जीवन संघर्ष

 *जीवनाचा वेध घेणारा काव्यसंग्रह म्हणजे-जीवन संघर्ष*

             जो माणूस जीवनात संघर्ष करतो. तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनात खूप संघर्ष केला म्हणून ते यशस्वी व्यक्ती ठरले. सांगली जिल्ह्यातले कवी नवनाथ रणखांबे यांचा जीवन प्रवास हाच एक जीवन संघर्ष आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या शिकवणी पासून प्रेरणा घेऊन तथागत बुद्धांच्या समतामूलक अष्टांग मार्गाने प्रेरित होऊन,अन्यायमूलक व्यवस्थेशी संघर्ष करत,शोषणमुक्त,भयमुक्त जीवन जगण्याची प्रेरणा देते आणि जाती धर्माच्या पलीकडे जाऊन अहंकाराला मूठमाती देतो. या काव्य संग्रहाचे मुखपृष्ठ नावाला साजेसे अतिशय सुंदर, गरुड भरारी घेणाऱ्या गरुड पक्षाचे आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शारदा प्रकाशन ठाणे यांनी केले असून प्रस्तावना प्राध्यापक डॉक्टर शहाजी कांबळे यांची लाभली आहे. प्राध्यापक दामोदर मोरे सरांनी पाठराखण केली असून या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ ८० रुपये आहे पण यातल्या सर्वच कविता जीवनाचा वेध घेणा-या आहेत.
          कवी नवनाथ रणखांबे सरांचे जीवन अतिशय संघर्षमय झाले असून त्यांचे वडील बाबासाहेबांच्या विचारांनी भारावून गेले असल्याने शैक्षणिक वाटचालीत बारकाईने लक्ष दिले. घरात शैक्षणिक वातावरण निर्माण केले. पोटाची भूक भागविण्यासाठी वेळप्रसंगी मोलमजुरी केली आणि ज्ञानाची भूक भागविण्यासाठी थोरामोठ्यांची पुस्तके वाचून घेतली. चरित्रे सांगून मुलांसमोर विचारवंताचा आदर्श ठेवला आणि मुलांना प्रोत्साहन देत गेले. आज वाढत्या तंत्रज्ञानाच्या या ग्लोबल दुनियेत आजची मुले पुस्तके हाताळताना दिसत नाहीत. सतत हातात स्मार्टफोन घेऊन रात्रंदिवस गेम खेळताना दिसतात. परिस्थिती कशीही असो त्यावर मात करून पुढे जाता आले पाहिजे. कवी नवनाथ रणखांबे यांच्या काव्यसंग्रहातून हेच दिसून येते.

             माय तुला मी पाहिलंय...
             माय तुला मी पाहिलंय... 
             अन्यायांनी पेटलेल्या 
              गेहिच्या परक्यांनी
              तुझ्या गेहाला बेघर केलंय
              अन उसवलं घरदार 
              आभाळ फाटले....
              माय तुला मी पाहिलंय.... माझ्या स्मृतीने...

              वरील ओळीतून कभी नवनाथ रणखांबे यांनी त्यांच्या आईचा जीवनसंघर्ष स्वतः पाहिला आहे. अनुभवला आहे.कवीने अन्यायाविरुद्ध त्यांची आई लढताना पाहिले आहे. घराचे वेगळे होताना... आभाळ फाटताना, वेदना होताना पाहीलंय. कवीच्या आजींनी जमीन गहाण ठेवलेली आईने संघर्ष करून सोडवून घेतली. वेळ प्रसंगीमोलमजुरी केली. कष्टातून स्वप्ने फुलवली. अन्यायाला जाळण्यासाठी कवीला वकील केले. संघर्षमय प्रवास कवी आपल्या लेखणीने शब्दबद्ध करतो कवितेच्या रूपात... इतरांनीही प्रेरणा घेण्यासाठी.. माय तुला मी पाहिलंय याकवितेतून संवेदनशील मनाचा कवी व्यक्त होतो.
         कवी नवनाथ रणखांबे सरांच्या सर्वच कविता मुक्तछंदातल्या असल्या तरी इतरांना प्रेरणा देणार्‍या, न्याय व हक्काने दाद मागणाऱ्या आहेत.वास्तवाचे दर्शन घडवणा-या आहेत. संघर्षमय जीवनाची वेदना मांडणा-या आहेत. अन्यायाविरुद्ध पेटून उठणा-या या कविता दिसून येतात.
       
          वाढल्या अडचणी , ढळलेला तोल 
           बिघडला क्रम, अवर्षण गोल
           सजीवांना जीवन संघर्ष संकटे 
           अडचणीने आवळला फास जगण्याचा 
           तारांबळ उडाली जिवांच्या जगण्याची....!!

        मानवाच्या अतिस्वार्थी वृत्ती मुळे आज जंगलाचा ऱ्हास होतोय. मोठमोठी जंगले संपुष्टात येत आहेत. कित्तेक वृक्ष तोडून तिथे सिमेंट काँक्रीटच्या टोलेजंग इमारती होत आहेत.त्यामुळे निसर्गाचे चक्र पार बदलून गेले आहे. समतोल ढळला आहे. त्यामुळे अडचणी वाढल्या. अवर्षणाचा सामना मानवाला आज करावा लागत आहे. प्रत्येक सजीवाचे जीवन संकटात सापडले आहे. वन्यप्राणी जीवन नष्ट होत चालले आहे. सजीवांना संघर्ष करावा लागत आहे. वन्य पशुपक्षी यांचे जीवन धोक्यात आले आहे. अशी आर्त हाक पेशाने वकील असणाऱ्या पण संवेदनशील मनाच्या कवीने आपल्या काव्यातून मुर्दाड मने झालेल्या माणसांना देतो आहे.

                  बा माझा ओरडला 
                  लेका आज पासून तुझी
                  शिक्षण हीच आई 
                  करियर हाच बा
                  मुंबई हीच पंढरी
                  परत आला माघारी
                  तर तंगड तोडीन
                  करिअर करून आल्यावर 
                   पारावर तुझा बॅनर लावीन
                   चावडीवर सत्कार ठेवीन
                    वाजत-गाजत मिरवणूक काढीन...

          वरील ओळींमधून नवनाथ रणखांबे यांच्या वडिलांचे त्यांच्या शिक्षणावर असलेले बारीक लक्ष दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ना की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. अगदी त्याचप्रमाणे कवीचे वडीलही कवीला खडसावून सांगतात की शिक्षण ही तुझी आई आणि करियर हा तुझा बा तू मुंबईला जा परत माघारी येऊ नकोस. परत घरी आलास तर तंगड म्हणजे पाय तोडून टाकीन आणि करियर करून आलास तर गावच्या पारावर तुझा बॅनर लावीन. चावडीवर सत्कार करीन. वाजत गाजत तुझी मिरवणूक काढीन. कष्टकरी बाप आपल्या लेकराला योग्य वयात योग्य दिशा दाखवतो. वेळ प्रसंगी घरातून काढून देतो. केवळ आपल्या मुलाने करिअर करून स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून. समाजात ताठ मानेनं जगावं अशी ज्या बापाची तळमळ होती त्याचा लेक आज शिकून वकील झाला आहे. ही अभिमानास्पद बाब वाखाणण्याजोगी आहे.
           कवी नवनाथ रणखांबे यांच्या प्रत्येक कवितेतून संघर्ष दिसून येतो.त्यांची कविता पान सुपार्‍या खाऊन टप-यावर थांबणा-या, मोटरसायकलवरून इकडून तिकडे बोंबलत फिरणाऱ्या तरुणाईला प्रेरणा देणा-या आहेत. जगायला शिकवणाऱ्या, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या, माय बापाचं ऋण व्यक्त करणाऱ्या, विषमतेची दरी बाजूला सारणाऱ्या, मानवतेला पोसणाऱ्या, उपाशी पोटाची व्यथा मांडणाऱ्या, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता शिकवणाऱ्या, जातीचे मळभ दूर लोटणा-या, माणसाला माणसाशी माणसासारखं जगायला शिकवणाऱ्या, आत्मीयतेचा शोध घेणाऱ्या, माणसाला शहाणपण शिकवणा-या, अन्यायावर प्रहार करणाऱ्या, लेखणीच्या धारदार शस्त्राने प्रहार करणाऱ्या, जीवनाचा वेध घेणाऱ्या एकूण ४६ कविता जीवन संघर्ष करायला शिकवणा-या आहेत. सर्वांनी आवर्जून वाचाव्यात अशाच आहे.
               कवी नवनाथ रणखांबे सरांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....!!

समीक्षिका/लेखिका/ शिक्षिका/ कवयित्री
 कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
मो.9767663257

Saturday, 13 March 2021

meenakshinagraleblogspot.com: सर फाऊंडेशनचे वाशिम जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्का...

meenakshinagraleblogspot.com: सर फाऊंडेशनचे वाशिम जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्का...: सर फाऊंडेशन चे वाशीम जिल्हा नारीशक्ति सन्मान पुरस्कार जाहीर कारंजा  - स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन अर्थात सर फाऊंडेशन व म...

सर फाऊंडेशनचे वाशिम जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्कार जाहीर...

सर फाऊंडेशन चे वाशीम जिल्हा नारीशक्ति सन्मान पुरस्कार जाहीर
कारंजा  - स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन अर्थात सर फाऊंडेशन व महाराष्ट्र वुमन टीचर्स फोरम च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त वाशीम जिल्ह्यातील आठ  कर्तृत्ववान शिक्षिकांचा जिल्हास्तरीय नारीशक्ति सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे,अशी माहिती वाशीम जिल्हा महिला समन्वयक  
कु.नीता तोडकर खाडे
व जिल्हा समन्वयक  गोपाल खाडे व विजयकुमार रौराळे यांनी दिली.लवकरचं कोव्हिड परिस्थितीचा  विचार करुन नियम पाळुन पुरस्काराचे  ऑनलाइन वितरण होणार आहे. शिक्षिका म्हणून कार्य करत असताना शाळा स्तरावर विविध नावीन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून अध्यापन,सामाजिक कार्यातील सहभाग व कोविड काळातील योगदान याचा विचार करुन या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.यावर्षीच्या वाशीम जिल्हा पुरस्कार विजेत्या
मंजुषा लहाबर कारंजा,मिनाक्षी नागराळे वाशिम
,प्रा.सविता मोरे मंगरुळपीर,
उषा हाडे रिसोड,
आश्विनी कुलकर्णी मानोरा,
गीता खंदारकर मालेगांव,
नीशा खुमकर कारंजा,
व श्वेता पळशीकर वाशिम
यांची निवड झाली आहे. ही निवड वाशीम जिल्हा महिला समन्वयक  
कु.नीता तोडकर खाडे व जिल्हा समन्वयक गोपाल खाडे व विजयकुमार रौराळे
यांनी ह्या निवडसमितीत काम पाहले. निवडीबद्दल सर फाऊंडेशनचे महिला राज्य समन्वयक सौ. हेमा शिंदे(वाघ),  राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे व बाळासाहेब वाघ यांनी अभिनंदन केले आहे.

खरी विद्येची देवता सावित्रीमाई फुले...

 *खरी विद्येची देवता- सावित्रीमाई फुले*

ज्या काळात स्त्रियांना फक्त चूल आणि मूल सांभाळावे लागायचे. स्त्री शिकली की धर्म बाटला.स्त्री शिकली की पाप वाटायचे. अशा काळात अनेक संघर्ष करत सावित्रीमाईंनी आपल्या अंगावर शेण,चिखल, दगड-गोटे, खरकटे पाणी लोक फेकत असत तरीही न डगमगता, न घाबरता साऊंनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्याच्यामुळेच आज भारतातल्या स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. ती सावित्रीआई म्हणजे खरी विद्येची देवता आहे. सावित्रीमाईचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील. आई सत्यवती नेवसे पाटील. सावित्रीआई अवघ्या ९ वर्षांच्या असताना त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. त्यावेळी ज्योतिरावांचे वय फक्त १३ वर्ष होते. तर सावित्री आईचे वय फक्त ९ वषाचे होते.पूर्वीच्या काळी बालविवाह पद्धत होती.सावित्री आईचे सासरे गोविंदराव फुले हे फुरसुंगीचे गोरे होते. परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली. म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांचे फुले हे आडनाव पडले. जोतिबांचे लहानपणीच आईचे छत्र हरवले त्यामुळे त्यांना आईचे प्रेम मिळाले नाही. त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या त्यामुळे त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. 
            सावित्रीआईंना लग्नापूर्वी एका ख्रिश्चन मिशनऱ्यांनी एक पुस्तक भेट दिले होते. ते लग्न झाले यावर सावित्री आईने सोबत आणले होते.त्यावरून ज्योतिबांना एक नवा मार्ग सापडला आणि त्यांनी सगुणाऊ व सावित्री दोघींनाही शिक्षण दिले.
             १ जानेवारी १८४८ रोजी बुधवार पेठेतील पुणे येथे भिड्याच्या वाड्यात सावित्रींना शाळा सुरू करून दिली. आणि एक नाही, दोन नाही तर तब्बल वीस शाळा सुरू केल्या. सावित्रीच्या अंगावर कर्मठ लोकांनी शेण फेकले, खरकटे पाणी फेकत, सर्व त्रास सहन करीत आपल्या निश्चयाच्या मार्गांवरून तसूभरही त्या डगमगल्या नाहीत. कारण ज्योतिबाची खंबीर साथ होती.आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया उंच भरारी घेत आहेत. फक्त सावित्रीमाईमुळेच.त्याकाळी विधवा स्त्रियांना समाज जगू देत नव्हता.सावित्री नसती तर आजही विधवा स्त्रियांना आपला जीव गमवावा लागला असता आणि सर्व मुलं सांभाळत राहावं लागलं असतं. पण एका गोष्टीचे वाईट वाटते. जेवढ्या स्त्रिया शिकून मोठ्या पदावर गेल्या ख-या पण आजही व्रतवैकल्यांच्या मागे लागलेल्या आपणांस पाहायला मिळतात. भोंदू बाबा, महाराज,बुवा,बापू इ.ची पूजाअर्चा,व्रत-वैकल्य,उपासतापास यामध्ये गुरफटलेल्या आहेत.खरी पूजा मानवसेवा. खरा धर्म म्हणजे सत्य हाच धर्म. मानव हाच देव जोपर्यंत स्वीकारून सत्यशोधक होणार नाहीत तोपर्यंत सावित्रीमाईनी केलेल्या कष्टाचे चीज होणार नाही. १८८४ मध्ये पुण्यात आलेल्या हंटर कमिशन पुढे सर्व जाती-धर्माच्या बारा वर्षाखालील मुला मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्याचा आग्रह धरला.

           शिका शिका रे विद्या शिका
           मनूचे काही ऐकू नका !
           कोणी मागे राहू नका 
            विद्या शिकूया ज्ञान घेऊया 
             एक होऊया, स्वावलंबी होऊया...!!

                या उक्तीप्रमाणे अस्पृश्य लोकांना शिक्षण देऊन मुलांना शाळेत पाठविण्यासाठी आग्रह करीत.सावित्रीने शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.शूद्रातिशूद्र, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन या ध्येयपूर्ती ने झपाटलेल्या सावित्रीमाईंची विचारशक्ती व प्रतिभा प्रगल्भ होती. शिक्षणामुळेच पशुत्व नष्ट होते आणि मनुष्यत्व येते. असे साऊला वाटायचे. शिक्षण हे समाज परिवर्तनासाठी आहे असे सिद्धांत मांडणाऱ्या सावित्रीमाईच आद्य भारतीय शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका व प्रथम शिक्षिका होत्या. त्या काळामध्ये सावित्रीला ज्योतिबाची खंबीर साथ होती. त्याकाळात शाळा बांधायला ना कुठले अनुदान होते. ना कुठला साधील खर्च होता. सावित्रीबाईंना पगार नव्हता. म्हणून सावित्रीआई हीच खरी विद्येची देवता आहे. म्हणून मी तिला सावित्रीबाई न म्हणता सावित्रीआई म्हणते. आणि माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थी सुद्धा सावित्रीआई, सावित्री माता, क्रांतीज्योती असे म्हणतात.

           फुले असूनी काटे वेचिले
           घेतला शिक्षणाचा ध्यास 
            तुझ्यामुळेच शिकलेल्या नारी
          आणि सुरू झाला शिक्षण प्रवास...!!

               सावित्रीमाई फक्त शाळा काढून थांबल्या नाहीत. तर काही ब्राम्हण विधवा स्त्रिया त्या काळी गरोदर होत्या. त्या विहिरीत जीव देण्यासाठी जाऊ लागल्या. अशा शंभर स्त्रियांना अभय देऊन त्यांची बाळंतपणे सुद्धा सावित्रीमाईंनी केली. पूर्वीच्या काळी फार विचित्र प्रथा होत्या. पती मरण पावल्यावर त्यांच्या पत्नीचे केशवपन करून त्या स्त्रियांना आयुष्यभर कुठलेही धार्मिक कार्य करण्यास बंदी असायची. सावित्री माईंनी या वाईट प्रथांना आळा घालण्यासाठी न्हाव्याचा संप घडवून आणला. एवढेच नाही तर एकूण १८९६ या दुष्काळात हजारो लोकांना मोफत अन्नछत्र चालवले सावित्रीआई स्वतः भाकऱ्या करून लोकांना जेऊ घालत.
                 जोतिबांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. आणि सावित्रीमाईंनी ते चालवले. बालहत्या प्रतिबंधक गृहातल्या सर्व अनाथ बालकांना सावित्रीमाईनी आपलीच मुले मानली. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले.त्याचे नाव यशवंत ठेवले. तोच पुढे डॉक्टर झाला. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीमाईंचा मोठा सहभाग होता. महात्मा फुले यांच्या निधनानंतर ही सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा सावित्रीआईने आपल्या खांद्यावर पेरून धरली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केले.त्या काळातल्या प्रसिद्ध कवयित्री,थोर लेखिका सावित्रीमाई होत्या.त्यांनी काव्यफुले,बावनकशी, सुबोध रत्नाकर, हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. इ.सन १८९६-९७ ला पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा आजार संसर्गजन्य असल्याने ब्रिटिश शासनाने संभाव्य रुग्णांना स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीमाईंनी पुण्याच्या ससाने माळरानावर दवाखाना सुरू केला.त्या रोग्यांना व कुटुंबियांना आधार देऊ लागल्या.रोग्यांची सेवा करताना सावित्रीआईंनाही प्लेग ची लागण झाली. त्यातच १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
            ज्योतिराव यांच्या निधनानंतर सुद्धा सतत सात वर्ष सावित्रीने घेतलेला वसा त्यांचे कार्य अविरत चालू ठेवले. डगमगून किंवा धीर सोडून रडत बसल्या नाहीत. तर संघर्ष करीत समाज सेवा अखंड करत राहिल्या. सावित्रीआईंना इंग्रजी सुद्धा खूप छानपणे येत होती. इंग्रजीचे ज्ञान सर्वांनी घ्यावी असे त्यांना मनापासून वाटायचे.अंधश्रद्धेवर सुद्धा कडाडून टीका करणाऱ्या सावित्री या ख-या विज्ञानवादी विचारसरणीच्या होत्या. 

          धोंडे मुले देती| नवसा पावती|
         लग्न का करती | नारी नर ||
    
                दगडाच्या मूर्तीला नवस करून जर मुले होत असतील तर लग्न करायची गरजच काय ? असा सवाल त्यांनी देवभोळ्या लोकांना केला आहे. सावित्री होत्या म्हणून आज आम्ही शिकलो आणि स्पर्धेच्या युगात टिकलो. आज स्वतःच्या पायावर उभे आहोत. माझ्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तर मला सावित्रीचा संघर्ष आठवतो आणि मला लढण्याचे, जगण्याचे बळ मिळते. आज शिकल्या सवरलेल्या महिला मोठ्या पदावर आहेत पण आजही त्यांच्या पायामध्ये, हाताला काळा दोरा बांधलेला आहे.आजही व्रतवैकल्यांमुळे तिचे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत चालले आहे. इथेच खरंतर विचार करण्याची गरज आहे.सावित्रीआईचे विचार डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा डोक्यात घातले पाहिजे.तुझ्या विचारांची गुट्टी मी माझ्या विद्यार्थ्यांना नक्कीच पाजणार आहे.
         
             तुझ्या कार्याचा वेलू 
             मी गगनाला नेईन
             तुझ्या विचारांचे गुट्टी
            मी विद्यार्थ्यांना देईन

              तुझ्या कार्याची भाऊ
              किती गाऊ गौरवगाथा 
              धन्य धन्य ती साऊ 
             तुझचरणी विनम्र माझा माथा...!!

       जय ज्योती....
          जय क्रांती....
            जय सावित्रीमाई....!!

*©️®️लेखिका कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो ९७६७६६३२५७

Wednesday, 3 March 2021

शिवा काशिद (स्वराज्याचा मावळा)

*शिवा काशीद*



शिवा काशीद हो वीर

होते ते प्रतिशिवाजी

रयतेच्या सुखासाठी

लावी जिवाजी हो बाजी....!



दिसायला हुबेहुब

शिवराय दिसायचे

शिवा काशीद पाहून

सारे जन फसायचे.....!



सिद्दी जोहरने त्यास

शिताफीने पकडले

नाही तो खरा शिवाजी

सिद्दी मगच कळाले....!



पोशाखही शिवाजीचा

शिवा काशीद सजले

गड विशाळगडी म्हणे

महाराज पोहचले.....!



काशीदांना पकडले

खूपसली तलवार

सिद्दी जोहरचा राग

जाला होता अनावर....!



पन्हाळगडाच्या खाली

समाधीचे घे दर्शन

शिवा काशीद मावळा

मन होईल प्रसन्न.....!



शूरवीर काशीदांना

करी मानाचा मुजरा

इतिहास घडवला

शिवा काशीद रे हिरा...!!



नेबापूरी हो स्मारक

शिवाजीने रे बांधले

यशवंत मुलग्यास

अधिकारी हो नेमले...!!



स्वराज्यासाठीच दिले

काशीदने बलिदान

गुप्तहेर खास होते

त्यांनी अप्रिले हो प्राण....!!



हिरा एक गमावला

प्रति शिवाजी हो गाजे

सिद्दी कंटाळून गेला

नाही सापडले राजे...!!

कवयित्री/लेखिका
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
(ही कविता 'स्वराज्याचे मावळे' या ऐतिहासिक काव्यसंग्रहात प्रकाशित असून नागराळे यांच्या फेसबुक,वृत्तपत्र व ब्लॉगवर प्रकाशित झालेली आहे.कविता आवडल्यास मुळ लेखकाच्या नावाने फॉरवर्ड करावी.... कोल्हापूरचा अजित सावंत स्वत:ला शिवभक्त म्हणणा-या चोरट्याने स्वत:च्या नावावर खपवण्याचा प्रकार उघडीस आला आहे...कायद्याने कॉपी राईट चा गुन्हा दाखल होऊ शकतो याची दक्षता घ्यावी)