Saturday, 13 March 2021

सर फाऊंडेशनचे वाशिम जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्कार जाहीर...

सर फाऊंडेशन चे वाशीम जिल्हा नारीशक्ति सन्मान पुरस्कार जाहीर
कारंजा  - स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन अर्थात सर फाऊंडेशन व महाराष्ट्र वुमन टीचर्स फोरम च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त वाशीम जिल्ह्यातील आठ  कर्तृत्ववान शिक्षिकांचा जिल्हास्तरीय नारीशक्ति सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे,अशी माहिती वाशीम जिल्हा महिला समन्वयक  
कु.नीता तोडकर खाडे
व जिल्हा समन्वयक  गोपाल खाडे व विजयकुमार रौराळे यांनी दिली.लवकरचं कोव्हिड परिस्थितीचा  विचार करुन नियम पाळुन पुरस्काराचे  ऑनलाइन वितरण होणार आहे. शिक्षिका म्हणून कार्य करत असताना शाळा स्तरावर विविध नावीन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून अध्यापन,सामाजिक कार्यातील सहभाग व कोविड काळातील योगदान याचा विचार करुन या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.यावर्षीच्या वाशीम जिल्हा पुरस्कार विजेत्या
मंजुषा लहाबर कारंजा,मिनाक्षी नागराळे वाशिम
,प्रा.सविता मोरे मंगरुळपीर,
उषा हाडे रिसोड,
आश्विनी कुलकर्णी मानोरा,
गीता खंदारकर मालेगांव,
नीशा खुमकर कारंजा,
व श्वेता पळशीकर वाशिम
यांची निवड झाली आहे. ही निवड वाशीम जिल्हा महिला समन्वयक  
कु.नीता तोडकर खाडे व जिल्हा समन्वयक गोपाल खाडे व विजयकुमार रौराळे
यांनी ह्या निवडसमितीत काम पाहले. निवडीबद्दल सर फाऊंडेशनचे महिला राज्य समन्वयक सौ. हेमा शिंदे(वाघ),  राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे व बाळासाहेब वाघ यांनी अभिनंदन केले आहे.

खरी विद्येची देवता सावित्रीमाई फुले...

 *खरी विद्येची देवता- सावित्रीमाई फुले*

ज्या काळात स्त्रियांना फक्त चूल आणि मूल सांभाळावे लागायचे. स्त्री शिकली की धर्म बाटला.स्त्री शिकली की पाप वाटायचे. अशा काळात अनेक संघर्ष करत सावित्रीमाईंनी आपल्या अंगावर शेण,चिखल, दगड-गोटे, खरकटे पाणी लोक फेकत असत तरीही न डगमगता, न घाबरता साऊंनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्याच्यामुळेच आज भारतातल्या स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. ती सावित्रीआई म्हणजे खरी विद्येची देवता आहे. सावित्रीमाईचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील. आई सत्यवती नेवसे पाटील. सावित्रीआई अवघ्या ९ वर्षांच्या असताना त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. त्यावेळी ज्योतिरावांचे वय फक्त १३ वर्ष होते. तर सावित्री आईचे वय फक्त ९ वषाचे होते.पूर्वीच्या काळी बालविवाह पद्धत होती.सावित्री आईचे सासरे गोविंदराव फुले हे फुरसुंगीचे गोरे होते. परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली. म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांचे फुले हे आडनाव पडले. जोतिबांचे लहानपणीच आईचे छत्र हरवले त्यामुळे त्यांना आईचे प्रेम मिळाले नाही. त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या त्यामुळे त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. 
            सावित्रीआईंना लग्नापूर्वी एका ख्रिश्चन मिशनऱ्यांनी एक पुस्तक भेट दिले होते. ते लग्न झाले यावर सावित्री आईने सोबत आणले होते.त्यावरून ज्योतिबांना एक नवा मार्ग सापडला आणि त्यांनी सगुणाऊ व सावित्री दोघींनाही शिक्षण दिले.
             १ जानेवारी १८४८ रोजी बुधवार पेठेतील पुणे येथे भिड्याच्या वाड्यात सावित्रींना शाळा सुरू करून दिली. आणि एक नाही, दोन नाही तर तब्बल वीस शाळा सुरू केल्या. सावित्रीच्या अंगावर कर्मठ लोकांनी शेण फेकले, खरकटे पाणी फेकत, सर्व त्रास सहन करीत आपल्या निश्चयाच्या मार्गांवरून तसूभरही त्या डगमगल्या नाहीत. कारण ज्योतिबाची खंबीर साथ होती.आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया उंच भरारी घेत आहेत. फक्त सावित्रीमाईमुळेच.त्याकाळी विधवा स्त्रियांना समाज जगू देत नव्हता.सावित्री नसती तर आजही विधवा स्त्रियांना आपला जीव गमवावा लागला असता आणि सर्व मुलं सांभाळत राहावं लागलं असतं. पण एका गोष्टीचे वाईट वाटते. जेवढ्या स्त्रिया शिकून मोठ्या पदावर गेल्या ख-या पण आजही व्रतवैकल्यांच्या मागे लागलेल्या आपणांस पाहायला मिळतात. भोंदू बाबा, महाराज,बुवा,बापू इ.ची पूजाअर्चा,व्रत-वैकल्य,उपासतापास यामध्ये गुरफटलेल्या आहेत.खरी पूजा मानवसेवा. खरा धर्म म्हणजे सत्य हाच धर्म. मानव हाच देव जोपर्यंत स्वीकारून सत्यशोधक होणार नाहीत तोपर्यंत सावित्रीमाईनी केलेल्या कष्टाचे चीज होणार नाही. १८८४ मध्ये पुण्यात आलेल्या हंटर कमिशन पुढे सर्व जाती-धर्माच्या बारा वर्षाखालील मुला मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्याचा आग्रह धरला.

           शिका शिका रे विद्या शिका
           मनूचे काही ऐकू नका !
           कोणी मागे राहू नका 
            विद्या शिकूया ज्ञान घेऊया 
             एक होऊया, स्वावलंबी होऊया...!!

                या उक्तीप्रमाणे अस्पृश्य लोकांना शिक्षण देऊन मुलांना शाळेत पाठविण्यासाठी आग्रह करीत.सावित्रीने शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.शूद्रातिशूद्र, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन या ध्येयपूर्ती ने झपाटलेल्या सावित्रीमाईंची विचारशक्ती व प्रतिभा प्रगल्भ होती. शिक्षणामुळेच पशुत्व नष्ट होते आणि मनुष्यत्व येते. असे साऊला वाटायचे. शिक्षण हे समाज परिवर्तनासाठी आहे असे सिद्धांत मांडणाऱ्या सावित्रीमाईच आद्य भारतीय शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका व प्रथम शिक्षिका होत्या. त्या काळामध्ये सावित्रीला ज्योतिबाची खंबीर साथ होती. त्याकाळात शाळा बांधायला ना कुठले अनुदान होते. ना कुठला साधील खर्च होता. सावित्रीबाईंना पगार नव्हता. म्हणून सावित्रीआई हीच खरी विद्येची देवता आहे. म्हणून मी तिला सावित्रीबाई न म्हणता सावित्रीआई म्हणते. आणि माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थी सुद्धा सावित्रीआई, सावित्री माता, क्रांतीज्योती असे म्हणतात.

           फुले असूनी काटे वेचिले
           घेतला शिक्षणाचा ध्यास 
            तुझ्यामुळेच शिकलेल्या नारी
          आणि सुरू झाला शिक्षण प्रवास...!!

               सावित्रीमाई फक्त शाळा काढून थांबल्या नाहीत. तर काही ब्राम्हण विधवा स्त्रिया त्या काळी गरोदर होत्या. त्या विहिरीत जीव देण्यासाठी जाऊ लागल्या. अशा शंभर स्त्रियांना अभय देऊन त्यांची बाळंतपणे सुद्धा सावित्रीमाईंनी केली. पूर्वीच्या काळी फार विचित्र प्रथा होत्या. पती मरण पावल्यावर त्यांच्या पत्नीचे केशवपन करून त्या स्त्रियांना आयुष्यभर कुठलेही धार्मिक कार्य करण्यास बंदी असायची. सावित्री माईंनी या वाईट प्रथांना आळा घालण्यासाठी न्हाव्याचा संप घडवून आणला. एवढेच नाही तर एकूण १८९६ या दुष्काळात हजारो लोकांना मोफत अन्नछत्र चालवले सावित्रीआई स्वतः भाकऱ्या करून लोकांना जेऊ घालत.
                 जोतिबांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. आणि सावित्रीमाईंनी ते चालवले. बालहत्या प्रतिबंधक गृहातल्या सर्व अनाथ बालकांना सावित्रीमाईनी आपलीच मुले मानली. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले.त्याचे नाव यशवंत ठेवले. तोच पुढे डॉक्टर झाला. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीमाईंचा मोठा सहभाग होता. महात्मा फुले यांच्या निधनानंतर ही सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा सावित्रीआईने आपल्या खांद्यावर पेरून धरली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केले.त्या काळातल्या प्रसिद्ध कवयित्री,थोर लेखिका सावित्रीमाई होत्या.त्यांनी काव्यफुले,बावनकशी, सुबोध रत्नाकर, हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. इ.सन १८९६-९७ ला पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा आजार संसर्गजन्य असल्याने ब्रिटिश शासनाने संभाव्य रुग्णांना स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीमाईंनी पुण्याच्या ससाने माळरानावर दवाखाना सुरू केला.त्या रोग्यांना व कुटुंबियांना आधार देऊ लागल्या.रोग्यांची सेवा करताना सावित्रीआईंनाही प्लेग ची लागण झाली. त्यातच १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
            ज्योतिराव यांच्या निधनानंतर सुद्धा सतत सात वर्ष सावित्रीने घेतलेला वसा त्यांचे कार्य अविरत चालू ठेवले. डगमगून किंवा धीर सोडून रडत बसल्या नाहीत. तर संघर्ष करीत समाज सेवा अखंड करत राहिल्या. सावित्रीआईंना इंग्रजी सुद्धा खूप छानपणे येत होती. इंग्रजीचे ज्ञान सर्वांनी घ्यावी असे त्यांना मनापासून वाटायचे.अंधश्रद्धेवर सुद्धा कडाडून टीका करणाऱ्या सावित्री या ख-या विज्ञानवादी विचारसरणीच्या होत्या. 

          धोंडे मुले देती| नवसा पावती|
         लग्न का करती | नारी नर ||
    
                दगडाच्या मूर्तीला नवस करून जर मुले होत असतील तर लग्न करायची गरजच काय ? असा सवाल त्यांनी देवभोळ्या लोकांना केला आहे. सावित्री होत्या म्हणून आज आम्ही शिकलो आणि स्पर्धेच्या युगात टिकलो. आज स्वतःच्या पायावर उभे आहोत. माझ्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तर मला सावित्रीचा संघर्ष आठवतो आणि मला लढण्याचे, जगण्याचे बळ मिळते. आज शिकल्या सवरलेल्या महिला मोठ्या पदावर आहेत पण आजही त्यांच्या पायामध्ये, हाताला काळा दोरा बांधलेला आहे.आजही व्रतवैकल्यांमुळे तिचे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत चालले आहे. इथेच खरंतर विचार करण्याची गरज आहे.सावित्रीआईचे विचार डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा डोक्यात घातले पाहिजे.तुझ्या विचारांची गुट्टी मी माझ्या विद्यार्थ्यांना नक्कीच पाजणार आहे.
         
             तुझ्या कार्याचा वेलू 
             मी गगनाला नेईन
             तुझ्या विचारांचे गुट्टी
            मी विद्यार्थ्यांना देईन

              तुझ्या कार्याची भाऊ
              किती गाऊ गौरवगाथा 
              धन्य धन्य ती साऊ 
             तुझचरणी विनम्र माझा माथा...!!

       जय ज्योती....
          जय क्रांती....
            जय सावित्रीमाई....!!

*©️®️लेखिका कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो ९७६७६६३२५७

Wednesday, 3 March 2021

शिवा काशिद (स्वराज्याचा मावळा)

*शिवा काशीद*



शिवा काशीद हो वीर

होते ते प्रतिशिवाजी

रयतेच्या सुखासाठी

लावी जिवाजी हो बाजी....!



दिसायला हुबेहुब

शिवराय दिसायचे

शिवा काशीद पाहून

सारे जन फसायचे.....!



सिद्दी जोहरने त्यास

शिताफीने पकडले

नाही तो खरा शिवाजी

सिद्दी मगच कळाले....!



पोशाखही शिवाजीचा

शिवा काशीद सजले

गड विशाळगडी म्हणे

महाराज पोहचले.....!



काशीदांना पकडले

खूपसली तलवार

सिद्दी जोहरचा राग

जाला होता अनावर....!



पन्हाळगडाच्या खाली

समाधीचे घे दर्शन

शिवा काशीद मावळा

मन होईल प्रसन्न.....!



शूरवीर काशीदांना

करी मानाचा मुजरा

इतिहास घडवला

शिवा काशीद रे हिरा...!!



नेबापूरी हो स्मारक

शिवाजीने रे बांधले

यशवंत मुलग्यास

अधिकारी हो नेमले...!!



स्वराज्यासाठीच दिले

काशीदने बलिदान

गुप्तहेर खास होते

त्यांनी अप्रिले हो प्राण....!!



हिरा एक गमावला

प्रति शिवाजी हो गाजे

सिद्दी कंटाळून गेला

नाही सापडले राजे...!!

कवयित्री/लेखिका
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
(ही कविता 'स्वराज्याचे मावळे' या ऐतिहासिक काव्यसंग्रहात प्रकाशित असून नागराळे यांच्या फेसबुक,वृत्तपत्र व ब्लॉगवर प्रकाशित झालेली आहे.कविता आवडल्यास मुळ लेखकाच्या नावाने फॉरवर्ड करावी.... कोल्हापूरचा अजित सावंत स्वत:ला शिवभक्त म्हणणा-या चोरट्याने स्वत:च्या नावावर खपवण्याचा प्रकार उघडीस आला आहे...कायद्याने कॉपी राईट चा गुन्हा दाखल होऊ शकतो याची दक्षता घ्यावी) 










Tuesday, 2 March 2021

उडनपरी-कालची 'ती' आणि आजची 'ती' भारताची सुवर्णकन्या - हिमा दास

*उडणपरी-कालची 'ती' आणि आजची 'ती'*

*भारताची सुवर्णकन्या-हिमा दास-गोल्डन गर्ल*

            पूर्वीचा एक काळ होता. त्या काळात स्त्री फक्त चूल आणि मूल करत होती. सावित्रीच्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. स्त्रियांना शिक्षण मिळत नसे. शिक्षणाची मक्तेदारी फक्त उच्चवर्णीयांकडेच होती. क्रांतीज्योती सावित्रीआई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अखंड समर्पक सेवेमुळे आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया उंच भरारी घेताना आपल्याला दिसत आहेत.आजच्या सावित्रीच्या लेकींनी आकाश कवेत घेतले आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी हे जग व्यापून टाकलं आहे.
      
            "आकाशाला कवेत घे 
            अशी तू भारतीय नारी 
             प्रयत्नांनी घे गरुडभरारी 
             दे उद्याला यशाची ललकारी....!!"

     या वरील उक्तीप्रमाणे कालची 'ती' ने आजच्या 'ती' ला  पार बदलून टाकले आहे. आज प्रत्येक क्षेत्रांमध्ये अनेक स्त्रियांनी बाजी मारलेली आहे. आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे -काल परवाच उडीसा सरकारने जिल्हा (डीएसपी) पोलिस उपअधीक्षक बनवले आहे. असे जिचे कर्तुत्व, भारताची उडानपरी,भारताची सुवर्णकन्या म्हणून अख्ख्या जगाला जी ची ओळख झाली ती 'हिमा दास' होय. जिला गोल्डन गर्ल म्हणून आज ओळखले जाते. ही भारताची पहिली सुवर्णकन्या ठरली आहे. ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही.सिंधू, जागतिक स्पर्धेतील पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पूनिया यांच्या मागोमाग आता गोल्डन गर्ल 'हिमा दास' हिच्यामुळे जगात भारताची मान या सावित्रीच्या लेकीमुळे आज अभिमानाने उंचावली आहे.
            हिमा दास हिचा जन्म ९ जानेवारी २००० मध्ये  आसाम राज्यातील नागाव जिल्ह्यातील धिंगजवळील कंधुलिमारी या छोट्याशा गावात झाला. तिचे वडील रणजीत दास आणि आई जोनाली दास हे भात शेती करतात. ती चार भावंडांमध्ये सर्वात लहान आहे. तिचे शिक्षण धिंग पब्लिक स्कूलमध्ये झाले. लहान वयात फुटबॉल खेळायला सुरुवात केली. ती शाळेत मुलांबरोबर फुटबॉल खेळत असे. तिला फुटबॉलमध्ये कारकीर्द घडवायची होती. पण श्याम शुक्ल हक यांच्या सूचनेवरून हिमा दास ने खेळ बदलला आणि धावपटू म्हणून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. जवाहर नवोदय विद्यालयाचे शारीरिक शिक्षक प्रशिक्षक शहा यांनी तिच्या नागाव स्पोर्ट्स असोसिएशन च्या गौरीशंकर रॉय यांच्याशी परिचय करून दिला. हिमादास नंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र झाली. आणि तिने या क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली.ही स्पर्धा २०१८ मध्ये 'आशियाई क्रीडा स्पर्धेत' महिला ४०० मीटर धावणे मध्ये रोपे पदक मिळविले. या स्पर्धेत मिश्र रिले ४×४०० मीटर मध्ये रोप्य पदक मिळविले.आणि २०१८ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला रिले ४×४०० मीटर धावणे स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तेंव्हा भारत सरकारने हिमा दास यांना अर्जून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यांनंतर IAAF जागतिक २० वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महिला ४०० मीटर मध्ये हिमाने एक सुवर्णपदक जिंकले.आणि २०१९ मध्ये विविध स्पर्धेमध्यें खालीलप्रमाणे यश संपादन केले.

पदक.            २०१९मधील विविध स्पर्धा.            महिला 
सुवर्ण          पोझनान ॲथलेटिक्स.                      २००मीटर
                                       
 सुवर्ण         कुत्नो ॲथलेटिक्स स्पर्धा, .        २०० मीटर
                   पोलंड महिला 

सुवर्ण            टाबोर स्पर्धा,                    महिला २०० मीटर
                     चेक प्रजासत्ताक

सुवर्ण           क्लादनो स्पर्धा,               महिला २०० मीटर
                    चेक प्रजासत्ताक 


 सुवर्ण           नोव मेस्टो ग्रांप्री, 
                    चेक प्रजासत्ताक            महिला ४०० मीटर

     अशा अनेक स्पर्धेत एकूण सहा सुवर्णपदक व दोन रोप्य पदक मिळवणारी हिमा दास ने बालपणीचे स्वप्न पूर्ण केलं.

        "जिंकण्याची उमेद हवी 
        हरण्याची तमा नसावी
        सातत्य व प्रयत्नांनी 
         जिंकण्याची जिद्द असावी....!!"

                  अशा प्रसिद्ध धावपटू हिमा दास ला २६ फेब्रुवारी २०२१ मध्ये आसाम पोलीस विभागात वयाच्या एकविसाव्या वर्षी पोलीस विभागात उपअधीक्षक डीएसपी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. लहानपणी पाहिलेले पोलिस अधिकारी होण्याचं स्वप्न आज अखेर यशस्वी झालं. कालची 'ती' आज 'पोलीस अधिकारी पदावर' फक्त तिच्या कर्तृत्वाने सिद्ध झाली आहे. हिमा दास यांना आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. गुवाहाटीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पोलीस महासंचालकांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला त्या वेळी हिमादास म्हणाल्या "मी लहानपणापासून पोलीस अधिकारी बनण्याची इच्छा होती मी हे स्वप्न पाहिलं होतं. शालेय दिवसापासूनच मला पोलिस अधिकारी व्हायचं होतं. माझ्या आईचे देखील हेच स्वप्न होतं. आई मला दुर्गापूजेच्या काळात खेळ म्हणून बंदूक घ्यायची आई म्हणते "पोलिसांची कामे करून मी चांगले माणूस बनावं"
            हिमा दासचं जेवढं कर्तृत्व तेवढंच दातृत्व सुद्धा दिसून येते. हिमा दास ने पहिला पगार कोरोना संकट काळासाठी आसाम सरकारला दान देणार आहे. इतकच नाही तर २०१८ मध्ये हिमा दास चा अपघात झाला. त्यावेळी तिला  जबर दुखापत झाली होती. तरी १८ महिन्यांच्या कालावधीनंतर हिमा दास ने पुन्हा खंबीरपणे आपले ध्येय साध्य करण्यासाठी, नवीन ऊर्जेने उभी राहिली. पहिल्या स्पर्धेत २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले.इंडियन ग्रा.पी. २ च्या महिला गटात तीने हे यश मिळविले. आसाम मध्ये जेव्हा पूरस्थिती आली होती. तेंव्हाही हिमाने अर्धा पगार पूरग्रस्तांसाठी मदत केली होती. एका शेतकर्‍याच्या मुलीने खूप संघर्ष करीत सामाजिक व स्पोर्ट्स क्षेत्रात देशाचे नाव जगात मोठे केले. या हिमा दास ला कुणी उडनपरी म्हणून ओळखतं, तर कुणी सुवर्णकन्या म्हणून ओळखतं, तर कुणी गोल्डन गर्ल म्हणून ओळखतं...

            "ध्येय साध्य करण्यासाठी 
              उत्तुंग भरारी घेऊया 
              परिस्थितीवर मात करण्या
               बाणा करारी ठेऊया....!!"

      आजच्या काळातील तरुण मुला-मुलींनी हिमादास चा आदर्श घ्यायला पाहिजे. अशा करारी बाण्याच्या सावित्रीच्या लेकीला, सुवर्णकन्येला, गोल्डन गर्लला मानाचा मुजरा...
खरं तर हा उत्सव तिच्या आत्मसन्मानाचा उत्सव फक्त एका दिवसाचा नसून सदैव तिच्या अस्मितेचा, तिच्या करारी बाण्याचा उत्सव ३६५ दिवस मनवला गेला तरी तोडकेच....!!

सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

लेखिका/समिक्षिका/शिक्षिका/संपादिका/कवयित्री
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Friday, 26 February 2021

शिवा काशिद (स्वराज्याचा मावळा)

*शिवा काशीद*



शिवा काशीद हो वीर

होते ते प्रतिशिवाजी

रयतेच्या सुखासाठी

लावी जिवाजी हो बाजी....!



दिसायला हुबेहुब

शिवराय दिसायचे

शिवा काशीद पाहून

सारे जन फसायचे.....!



सिद्दी जोहरने त्यास

शिताफीने पकडले

नाही तो खरा शिवाजी

सिद्दी मगच कळाले....!



पोशाखही शिवाजीचा

शिवा काशीद सजले

गड विशाळगडी म्हणे

महाराज पोहचले.....!



काशीदांना पकडले

खूपसली तलवार

सिद्दी जोहरचा राग

जाला होता अनावर....!



पन्हाळगडाच्या खाली

समाधीचे घे दर्शन

शिवा काशीद मावळा

मन होईल प्रसन्न.....!



शूरवीर काशीदांना

करी मानाचा मुजरा

इतिहास घडवला

शिवा काशीद रे हिरा...!!



नेबापूरी हो स्मारक

शिवाजीने रे बांधले

यशवंत मुलग्यास

अधिकारी हो नेमले...!!



स्वराज्यासाठीच दिले

काशीदने बलिदान

गुप्तहेर खास होते

त्यांनी अप्रिले हो प्राण....!!



हिरा एक गमावला

प्रति शिवाजी हो गाजे

सिद्दी कंटाळून गेला

नाही सापडले राजे...!!

कवयित्री/लेखिका
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
(ही कविता 'स्वराज्याचे मावळे' या ऐतिहासिक काव्यसंग्रहात प्रकाशित असून नागराळे यांच्या फेसबुक,वृत्तपत्र व ब्लॉगवर प्रकाशित झालेली आहे.कविता आवडल्यास मुळ लेखकाच्या नावाने फॉरवर्ड करावी.... कोल्हापूरचा अजित सावंत स्वत:ला शिवभक्त म्हणणा-या चोरट्याने स्वत:च्या नावावर खपवण्याचा प्रकार उघडीस आला आहे...कायद्याने कॉपी राईट चा गुन्हा दाखल होऊ शकतो याची दक्षता घ्यावी)