आज संपूर्ण जगामध्ये कोरूना covid 19 या विषाणूने थैमान घातले आहे.चीन,अमेरिका, इटली सारख्या देशात हजारोंच्या संख्येने लोक मरत आहेत. मोठमोठ्या प्रगत राष्ट्रांमध्ये भरपूर प्रमाणात सुख-सुविधा दवाखाने असून सुद्धा हा महाभयंकर आजार आटोक्यात यायला बराच वेळ लागतो आहे. भारतासारख्या देशात लवकरच लॉकडाउन केल्यामुळे परिस्थिती आटोक्यात आणणे शक्य झाले आहे. तरीसुद्धा प्रत्येक नागरिकांनी "मीच माझा रक्षक" म्हणून घरात थांबावयाचे आहे. तरच आपण या महामारी विरुद्ध लढा देऊ शकतो. आणि हा महाभयंकर आजार आटोक्यात आणू शकतो.
आज पहिल्यांदा असे झाले आहे की संपूर्ण भारत 21 दिवसांसाठी (पुढे वाढतील ही) जागेवर थांबला आहे. आज सारे प्राणी, पक्षी मुक्तपणे बाहेर निसर्गात संचार करताना दिसतात. पण दुर्दैवी गोष्ट आहे की मनुष्यप्राणी मात्र घरात कोंडून घेतला आहे.आणि ते फार गरजेचे, महत्त्वाचे आहे. सर्वांनी बाहेर जाणे काटेकोरपणे टाळले पाहिजे.तरच आपण निशस्त्र होऊन या कोरोना विरुद्ध लढा देऊ शकतो आणि त्याला हरवू शकतो.
निसर्गात फार मोठी ताकद आहे.आज वर्षानुवर्षे होत असलेली नैसर्गिक हानी आता भरून निघत आहे. असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. आपण पाहतो कित्येक वर्ष झाली रस्त्यावर गाड्यांचा साम्राज्य, होणारा गाड्यांचा धूर, वाढते प्रदूषण, कारखाने, गर्दी माणसांची वेगळी आणि वाहनांची वेगळी, बाहेर मोठ्या शहरात जीव गुदमरल्यासारखा वाटायचा पण या २१ दिवसाच्या लॉकडाऊनच्या काळात सर्व वातावरण कसे छान,प्रसन्न, स्वच्छ झाले आहे.मोठमोठ्या शहरांमध्ये स्वच्छ वातावरण झाले. नाही कसला धूर, ना दमट हवा, दमट वातावरण नाही,ना कसले व्यसन, ना कुठले हॉटेल्स उघडे, ना हॉटेल्समध्ये पिझ्झा-बर्गर खाणारी पिढी. आज मोठ्या शहरांमध्ये लोक जीवाच्या आकांताने खेडे गावाकडे धाव घेत आहेत.स्वार्थापोटी आई-वडील खेडेगावात सोडून श्रीमंतीची हाव उराशी कवटाळून मृगजळासारखी स्वप्न पाहणारी लोकं शहराकडे धाव घेणारी सुसक्षित मंडळी आज अचानकपणे गावाची आठवण आली आणि गावाकडे निघून आली आहेत.सर्वजण गावी येऊन आई-वडिलांसोबत घरात कुटुंबासमवेत जगताना दिसताहेत हे सारे एका विषाणूने शिकवलं....
आयुष्यभर पैशासाठी मरमर करणारा माणूस जागेवरच थांबला. आता मानवाला कळून चुकलं की जीवन जगायला खूप काही लागत नाही. फार कमी गरजा आहेत मानवाच्या ...तसं पाहिलं तर अन्न,वस्त्र, निवारा या तीनच मुख्य गरजा आहेत पण खोट्या दिखाव्यापोटी अति पैसा कमावण्याच्या नादात मोठे उद्योगधंदे,कारखाने उभे करण्यासाठी पर्यावरणाशी, निसर्गाशी अन्याय मानवाने केला आहे. मोठी जंगले शेती नष्ट करून त्यावर दहा-वीस मजली मोठमोठ्या इमारती सिमेंटच्या उभ्या केल्या आहेत. आज केवढी मोठी बंगले ओस पडली आहेत. शहरात कोरोना येईल आणि आमच्या जीवाला धोका होईल हे ओळखून आज ग्रामीण भागात लोकांनी धाव घेतली आहे. आणि हा बाहेरून येणारा रोग आज काही अंशी ग्रामीण भागात सुद्धा पोहोचला आहे.
ग्रामीण भागात शहरी भागाइतका मोठा धोका नाही. ग्रामीण भागातला शेतकरी आजही शेतीची कामे करतोय. आणि देशाला पुरेल असा धान्य पिकवतो.तोच जगाचा खरा पोशिंदा आहे माझा बळीराजा... काबाडकष्ट करतो आहे. देवाच्या रूपात आज रस्त्यावर पोलीस, डॉक्टर्स, नर्स उभे आहेत स्वतःचा जीव धोक्यात घालून... या संसर्गजन्य रोगाचा प्रतिकार करण्यासाठी रात्रंदिवस सज्ज आहेत.ज्या मंदिराला जरी कुलूप लागली असली तरी मंदिराच्या ट्रस्ट या संस्था अशा या कोरोनाला हरविण्यासाठी कोटी ने मदतीचा हात देत आहेत. मोठे अभिनेते, उद्योगपती, दानशूर लोक,खेळाडू या चांगल्या कार्यासाठी सर्वोत्परी मदतीचा हात देत आहेत... हे सारे एका विषाणूंनी शिकवलं....
आज कितीतरी लोक घरात बसून चांगल्या कामाची सुरुवात करीत आहेत. मुलाबाळांची कमी होत चाललेला संवाद धावत्या युगात सोबत पाळणारा माणूस आणि आईवडिलांसोबत बायकोसोबत वेळ घालवीत आहे. मायेने पाहण्याचा दृष्टीकोण या विषाणूने शिकवला आहे.किती पुरुष मंडळींनी या सुट्ट्या छान उपयोग केलेला दिसतो आहे. प्रत्येकाची वेगवेगळी कला बाहेर पडताना दिसते....
बऱ्याच जणांनी या लॉकडाऊन च्या काळात घराची स्वच्छता,नीटनेटकेपणा करून घर स्वच्छ, छान ठेवले आहेत. कितीतरी जणांनी रोज नवनवीन पदार्थ करून आपल्या बच्चेकंपनीला आई-वडिलांना पत्नीला खाऊ घातले आहेत. काही जणांनी बगीच्या सुंदर करण्याचा, बाग काम करण्याचा प्रयत्न केला आहे... बाहेरचे हॉटेलमधले पिझ्झा बर्गर नूडल्स हे सर्व खाणे बंद होऊन साधेच घरच्या घरी पदार्थ आवडीने खात आहेत. जिभेचे चोचले पैसे उधळून बंद झाले आहे.
इतर वेळेस मॉलमध्ये, कपड्याच्या दुकानात, शॉपिंग सेंटर वर हॉटेलवर भरगच्च दिसणारी लोक आज घरात घुसून बसली आहेत. कितीतरी पैसा खर्च करणारे लोक आज त्यांच्या खिशातला एक रुपयाही हल्ला नाही. ना कसला खर्च नाही तर बऱ्याच जणांना पगारही पुरायचा नाही आणि चैनीसाठी कर्ज काढणाऱ्या लोकांना आळा बसला आहे आज लोकांना पैसा हे साधन आहे हे कळाले आहे.. साध्य होणार मुळीच नाही... आपला जीव सर्वात महत्त्वाचा आहे हेच खरे सत्य आहे.... तू जीव जपण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे काही हातावरच्या बोटावर मोजण्याइतकी लोक सोडली तर सर्वजण लॉकडाऊनचा नियम पाळत आहेत.इतर राज्यातले जे मजूर लोक लोक अडकून पडले आहेत. अशा लोकांना मदतीचा हात देण्यासाठी अनेक लोक समोर येऊन माणुसकीचे दर्शन घडवताना दिसताहेत मदतीचा हात देताना दिसत आहेत आणि प्रत्येक जण मनोमन प्रार्थना करीत आहे की हे देशावरचे संकट टळू दे अशी आर्त हाक ईश्वराला देत विनंती करीत आहे...
एकंदरीत मानवाचा वाढता अतिरेक कमी झाला आहे. कुठेतरी ब्रेक लागला.खर्च कमी झाला.गरजा कमी झाल्या. साध्यासाध्या आधारासाठी दवाखान्यात पळणारी लोक घरच्या घरीच काळजी घ्यायला लागली आहेत.रिकाम्या वेळेत पेंटिंग,चित्रकला ,टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू तयार करता येऊ लागल्या. फोर व्हीलर, टू व्हीलर, बसेस रात्रंदिवस पळणाऱ्या गाड्या जाग्यावर थांबल्या आहेत.मनुष इतरांपेक्षा स्वतःची काळजी घ्यायला लागला हे सारे एका विषाणूने शिकवलं......
गावाला जाऊन मोकळं वातावरण,आपली माणसं, गावाकडची नाती गोती, गावाकडची माती इत्यादीची नाळ जोडता आली.इतिहासात आतापर्यंत कधीही न थांबलेला पूर्ण भारत एका जाग्यावर थांबला. नातेवाईक मित्रमंडळी यांच्यामध्ये आपुलकीची, भावना वाढीस लागली आहे एकमेकांची काळजी करण्यासाठी संवाद साधू लागली आहेत.अचानक मरण डोळ्यांना दिसताना आपुलकी स्नेह माया प्रेम वाढले आहे. एकमेकांना मदतीची भावना निर्माण झाली डॉक्टर्स, नर्स, पोलीस इत्यादीच्या रूपात देव दिसायला लागला आहे. पोलिसांची आदरयुक्त भीती निर्माण झाली आहे गजबजलेले शहर नकोशी वाटणारी गर्दी,निर्मनुष्य रस्ते बरे वाटायला लागली आहे हे सारं एका विषाणूंनी शिकवलं....!!
©️®️ *लेखिका/कवयित्री*
*कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे*